बनावट मद्याच्या गुन्ह्याचे कनेक्शन विखेंच्या कारखान्याशी !

नाशिक: वृत्तसंस्था । लिकर किंग अतुल मदन याच्यावर बनावट मद्य गुन्ह्यात कारवाई करण्यात आली असतानाच याचे कनेक्शन विखे पाटील कारखान्याशी असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी व्यक्त केला आहे.

कारवाईत जप्त केलेले मद्य आणि विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यातील मद्याचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या दोन्ही नमुन्यांत साधर्म्य आढळल्यास भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढणार आहेत

पशु खाद्याच्या ट्रकमधून अवैधरित्या मद्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी मालेगावातील टेहरे फाटा येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आणला होता. लिकर किंग म्हणून ओळखला जाणारा अतुल मदन याचा हा माल असल्याची माहिती पुढे आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मदन याची नाशिकमध्ये २६ दुकाने असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दुकानांची तपासणी केली. अनियमिततेमुळे त्यापैकी १४ दुकाने बंद करण्यात आली. यापैकी दोन दुकांनामध्ये सुमारे ५० लाख रुपयांचे १२०० बॉक्स बनावट मद्य आढळल्याची माहिती डॉ. अंचुळे यांनी दिली होती. आता आणखी धक्कादायक माहिती अंचुळे यांनी आज दिली.

मदन याच्याकडील हस्तगत केलेले मद्य हे अहमदनगर जिल्ह्यातील बडे राजकीय घराणे म्हणून ओळखल्या विखे पाटील यांच्या कारखान्यातील असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. त्यामुळे या कारखान्यातील मद्याचे नमुने आणि कारवाईत जप्त केलेल्या मद्याचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविल्याची माहिती डॉ. अंचुळे यांनी दिली आहे.

भाजपचे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या असताना आता भाजपचे दुसरे बडे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्याचे नाव बनावट मद्य प्रकरणात पुढे आल्याने विखे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता बळावली आहे.

Protected Content