मुंबई प्रतिनिधी | देशात नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बनावट नोटा वापरात आल्या होत्या. याचे रॅकेट हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत होते असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी केला आहे. त्यांनी आज फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावत त्यांनी अनेक गुंडांना महत्वाची पदे दिल्याचा गौप्यस्फोट केला.
नवाब मलीक यांनी कालच बुधवारी आपण गौप्यस्फोटांचा हायड्रोजन बॉंब फोडणार असल्याचा आरोप केला होता. या अनुषंगाने त्यांनी आज सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदींनी नोटबंदी जाहीर केली. यानंतर देशभरात अनेक ठिकाणी बनावट नोटा पकडण्यात आल्या. देशभरात या संदर्भात छापेमारी करण्यात आली. मात्र महाराष्ट्रात अशा कारवाया झाल्या नाहीत. तब्बल ११ महिन्यांनी राज्यात १४ कोटींच्या नोटा पकडण्यात आल्या. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यात फक्त आठ लाख रूपयांच्या नोटा दाखवून आरोपींचा बचाव केला. बनावट नोटांचा संबंध हा पाकीस्तान आणि त्यातही दाऊद कंपनीशी असल्याने फडणवीस यांनी देशाला हानीकारक ठरेल असे कृत्य केल्याचे आरोप मलीक यांनी केले.
दरम्यान, फडणवीस यांनी अनेक गुंडांना महत्वाच्या पदावर नेमल्याचा आरोप देखील मलीक यांनी केला. हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं. हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, याच्या दुसर्या पत्नीवर खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असांना त्यांच्या कार्यालयातून फोन गेला. तसेच यासोबत रियाज भाटी या गुन्हेगारासोबत फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोप देखील मलीक यांनी केला. तर, नवाब मलिकांनी म्हटलं की, २००५ साली मी मंत्रीपदावर नव्हतो. सलीम पटेलचा मृत्यू झालाय ही माहिती मला ५ महिन्यांपूर्वी मिळाली आहे. सलीम पटेलचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्यांवरुन सलीम पटेलनं त्यावेळी अनेक माध्यमांवर डिफमेशन दाखल केले होते, असं मलिक म्हणाले.