जळगाव प्रतिनिधी । बनावट दस्तावेज तयार करुन तसेच खोटी महिला उभी करीत महिलेची शेतजमीन विक्री प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दुसऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी आज अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जयकिसन भगवान पाटील रा.शनिपेठ जळगाव ह.मु. शांती नगर माकडखेडा ता. तरसावद जि.खरगोन (मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुजरात येथील भावनगरातील आशा सुनिल ढोलकिया (४५) रा. बी अक्षर तेनामेंट शिवशक्ती पार्क शिहोर यांच्या मालकीचे कंडारी शिवारात शेत आहे. संशयित आरोपी प्रकाश रामचंद्र नेहकर, जयकिसन भगवान पाटील, किशोर धनाजी शर्मा यांनी आपल्या फायद्यासाठी या शेताचे बनावट कागदपत्र व सातबारा उतारा तयार केला. तसेच त्या कागदपत्रांवर आशा ढोलकिया यांचे नाव लावून व बनावट महिला उभी करुन खरेदीखत तयार करीत दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी केली होती. त्याचप्रमाणे या संशयित आरोपींनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता कुणत्याही प्रकारचा नजराणा भरलेला नसून शासनाची फसवणूक केल्याची घटना ६ नोव्हेंबर २०११ रोजी घडली होती.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १४ मार्च २०२० रोजी प्रकाश रामचंद्र नेहकर, जयकिसन भगवान पाटील, किशोर धनाजी शर्मा या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तिघे फरार होते. यातील नेरकर याला २६ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना शहर पोलिसांनी अटक केली. तर दुसरा आरोपी जयकिसन पाटील याला आज १९ ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. तर तिसरा संशयित आरोपी शर्मा हा अद्याप फरार आहे. संशयित आरोपी जयकिसन पाटील याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉं रविंद्र सोनार हे करीत आहे.