डेहराडून : वृत्तसंस्था । खासगी लॅबकडून कुंभमेळ्यादरम्यान केलेल्या चाचण्यांचे बनावट अहवाल सादर करण्यात आल्याच्या आरोपाबद्दल आता उत्तराखंड सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
कुंभमेळ्यादरम्यान झालेली गर्दी आणि करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन अशा अनेक बाबींची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली होती.
या धार्मिक उत्सवात हजारो भक्तगण सामील झाले होते. एक एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हा कुंभमेळा हरिद्वार, डेहराडून, तेहरी आणि पौरी या ठिकाणी भरला होता. या बनावट अहवालाचं प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा पंजाबमध्ये असलेल्या एका व्यक्तीला कोरोना चाचणीसाठी आपलं सॅम्पल घेतल्याचा मेसेज आला होता. ही व्यक्ती कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये पंजाबमध्ये होती. या व्यक्तीने आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबरचा बनावट अहवालासाठी गैरवापर केल्याची तक्रार ICMR कडे दाखल केली होती. ICMR ने ही गोष्ट उत्तराखंड सरकारच्या लक्षात आणून दिली.
उत्तराखंड सरकारने या खासगी लॅबने कुंभमेळ्यादरम्यान केलेल्या सर्व चाचण्यांची प्राथमिक तपासणी केली. त्यात असे अनेक बनावट अहवाल आढळल्यानंतर सखोल चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. या लॅबला कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
एकूण २४ खासगी लॅब्ज कुंभमेळ्यादरम्यान सहभागी भाविकांच्या चाचण्या करत होत्या. त्यापैकी १४ जिल्हा प्रशासनाने नेमून दिलेल्या होत्या तर १० कुंभमेळा व्यवस्थापनाच्या होत्या. उत्तराखंड उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की कुंभमेळ्यादरम्यान ५०, ००० चाचण्या करण्यात आल्या आहेत. हरिद्वारचे जिल्हाधिकारी सी. रविशंकर यांनी सांगितलं की तीन सदस्याची एक समिती चौकशीसाठी नेमण्यात आली आहे. इतरही सर्व लॅब्सच्या अहवालांची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर ही समिती १५ दिवसांमध्ये अहवाल सादर करेल. आरोपांमध्ये तथ्य असेल तर मात्र FIR दाखल केली जाईल आणि संबंधितांवर कारवाई होईल.
कुंभमेळ्याचे आरोग्य अधिकारी अर्जुन सिंग सेंगर यांनी सांगितलं की कुंभमेळा व्यवस्थापनाने नेमून दिलेल्या लॅब्स या ICMR ची परवानगी असलेल्या होत्या आणि त्यांनी कुंभमेळ्यादरम्यान RTPCR आणि अँटिजेन मिळून दोन लाखांहून अधिक चाचण्या केल्या आहेत. त्यांना नऊ कोटीहून अधिक रक्कम मोबदला म्हणून देण्यात आली आहे.