नगर: वृत्तसंस्था । ‘एम्स’ अहवालात सुशांतची हत्या झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्राची आणि पोलिसांची बदनामी केली, त्या लोकांनी आता तोंड न लपवता जाहीरपणे महाराष्ट्राची आणि पोलिसांची बदनामी केल्याबद्दल माफी मागावी,’ अशी मागणीच राज्यातील भाजप नेत्यांचे नाव न घेता आमदार रोहित पवारांनी केली आहे.
हे ट्विट करताना त्यांनी ‘सत्यमेवजयते’ हा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर राजकारण झाले. मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून ‘सीबीआयकडे’कडे सोपवण्यात आला. आता ‘एम्स’च्या अहवालावरून जी माहिती समोर येतेय, त्यामध्ये सुशांतची आत्महत्याच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या अहवालावरून रोहित पवार यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
ट्वीटरच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतलाय.‘बिहार निवडणुकीसाठी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर ‘एम्स’च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे. असेही पवार यांनी स्पष्ट केलेय.
सुशांतच्या मृत्यूच्या बाबतीत एक मोठा जनआक्रोश आहे. काहीतरी लपवलं जात आहे, असं लोकांना वाटतंय. वेगवेगळे खुलासे येताहेत. सातत्यानं मागणी होऊनही सरकार सीबीआय चौकशीला नकार देत आहे’, असे नमूद करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, इतकेच आमचे म्हणणे आहे. बिहार निवडणुकीचा काहीही संबंध नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.