पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील मोंढाळे बंद घराचे कुलूप तोडुन घरात अनाधिकृतपणे प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी घरातील २७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २६ हजार रुपये रोख असा ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोंढाळे ता. पाचोरा येथील संदिप आनंदा पाटील (वय – ३६) हे त्यांच्या पत्नी राजश्री यांचेसह दि. ७ फेब्रुवारी रोजी शेतातील कामासाठी गेले होते. सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत शेतीची कामे आटोपल्यानंतर संदिप पाटील व राजश्री पाटील हे पती – पत्नी पाचोरा येथे नातेवाईकांकडे पाहुणे आले असल्या कारणाने पाचोरा येथेच मुक्कामी थांबले. दरम्यान रात्री २:३० वाजेच्या सुमारास संदिप यांना मावस भाऊ विनायक वसंत पाटील यांचा भ्रमणध्वनी आला की, तुझ्या घराचा दरवाजा उघडा दिसत असुन कुलुप तुटलेले आहे. हे ऐकताच संदिप पाटील हे पत्नी राजश्री सह मोंढाळे येथे आले असता त्यांना घरातील कोठीत ठेवलेले २४ हजार रुपये किंमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ६ हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ६ हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, ६ हजार रुपये किंमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुल, २ हजार रुपये किंमतीची सोन्याची नथ, ३ हजार रुपये किंमतीचे दिड ग्रॅम वजनाचे लहान बाळाचे दाग व २६ हजार रुपये रोख असा एकुण ७३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाल्याने संदिप पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन गाठत दि. ८ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे हे करीत आहे. मोंढाळे गावात अजुन तीन ठिकाणी चोरी झाल्याने मोंढाळे गावात ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच चोरट्यांचा शोध घेवुन गजाआड करावे अशी मागणी देखील ग्रामस्थांकडुन होत आहे.