बंडखोर आमदारांना नोटीस देण्याच्या हालचाली

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  वृत्तसंस्था | एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना नोटीसा बजावण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात प्रदीर्घ बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये कायदेशीर लढाईस प्रारंभ होणार असल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यातर्फे शिवसेनेचे नवीन गटनेते अजय चौधरी यांनी बंडखोर १२ आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस दिली आहे. यानंतर आज पुन्हा काही आमदारांना अपात्र करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी आज नरहरी झिरवाळ यांची अधिकार्‍यांसह विधीज्ज्ञांसह दोन तासांपासून चर्चा सुरू आहे. तर अपक्ष आमदार महेश बालदी यांनी
झिरवाळ यांना अपात्र करण्याचे अधिकार देऊ नये अशी मागणी केली. त्यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली देखील सुरू केल्या आहेत. यासाठी ते लवकरच अधिकृतपणे मागणी करू शकतात. मात्र त्यांची ही मागणी देखील इतक्या लवकर मान्य होईल अशी शक्यता दिसून येत नाही. यामुळे आता राज्य सरकार आणि विशेष करून शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा गट यांच्यात आता कायदेशीर डावपेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content