फ्रान्स : करोनाची तिसरी लाट आल्याने एक महिन्याचा लॉकडाउन

 

पॅरिस : वृत्तसंस्था । भारताबरोबरच जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्याकडे अनेक देशांचा कल आहे. फ्रान्समध्येही वाढती बाधितांची संख्या लक्षात घेऊ पंतप्रधान जीन कैस्टेक्स यांनी मर्यादित लॉकडाउनची घोषणा केलीय.

 

पंतप्रधानांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पॅरिससहीत देशातील १६ ठिकाणी एका महिन्यांच्या लॉकडाउनची घोषणा केलीय. शुक्रवारी मध्यरात्रीपासून चार आठवड्यांसाठी हा लॉकडाउन लागू होणार आहे. नवीन लॉकडाउनमध्ये मार्च आणि नोव्हेंबरमधील आधीच्या लॉकडाउनसारखे कठोर निर्बंध नसतील. शाळा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या लॉकडाउनमुळे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हिशोबाने पुन्हा सर्व काही सुरु करण्याच्या योजना पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. या लॉकडाउनमुळे मॅक्रॉन यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय.

 

“या लॉकडाउनमध्ये लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र मित्रांच्या घरी जाऊन पार्टी करणे, सोशल डिस्टन्सींगचे नियम न पाळणे, मास्क न घालण्यासाठी हा लॉकडाउन लागू करण्यात आलेला नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं,” अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी नियम न पाळणाऱ्यांचे कान टोचले आहेत. नवीन नियमांनुसार जास्तीत जास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम पर्याय निवडावा असं सांगण्यात आलं आहे. परवानगी पत्र असेल तरच लोकांना घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी आणि व्यायम करण्याची परवानगी दिली जाईल. कोणालाही आपल्या घरापासून १० किमीपेक्षा जास्त दूर जाता येणार नाही. रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.

 

फ्रान्समधील या लॉकडाउनदरम्यान शाळा आणि विद्यापीठे सुरु राहणार आहेत. सर्व अत्यावश्यक सेवा  पुस्तकं आणि संगीताशीसंबंधित दुकाने सुरु टेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी कैस्टेक्स यांनी मंगळवारी  ही तिसरी लाट असून तिने देशात प्रवेश केलाय असं म्हटलं होतं. त्यांनी या तिसऱ्या लाटेनेही देशाला मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडला असून संसर्ग झालेल्यांची संख्या वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कैस्टेक्स यांनी संसदेला संबोधित करताना, “महामारी ओव्हरटाइमचा खेळ करत आहे. याला आम्ही तिसरी लाट म्हणून पाहत आहोत,” असं म्हटलं होतं. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकेडवारीनुसार फ्रान्समध्ये आतापर्यंत ४२ लाखांहून अधिकांना  संसर्ग झाला असून ९१ हजार ८०० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.

 

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून देशातील अर्थचक्राला गती मिळवून देण्यासाठी टप्प्या टप्प्यात सेवा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतले होते. मात्र आता पुन्हा एकदा पॅरिससोबत १६ ठिकाणी लॉकडाउनची घोषणा करण्यात आलीय. याचा पुन्हा एकदा फ्रान्सला मोठा आर्थिक फटका बसू शकतो असा अंदाज आहे. तिसऱ्यांदा लॉकडाउन करण्यात आल्याने आता अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाला धोका पोहचू शकतो, असं मॅक्रॉन यांच्या निटकवर्तीयांचा अंदाज आहे. या लॉकडाउनमुळे ओढावणाऱ्या आर्थिक संकटामधून सावरण्यासाठी मॅक्रॉन प्रशासनाला जास्त जोर लावावा लागणार आहे.

Protected Content