फोन टॅपिंगच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार — फडणवीस

 

मुंबई : वृत्तसंस्था । फोन टॅपिंगप्रकरणी केंद्रीय गृह सचिवांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी आज दिल्लीला जात असून केंद्रीय गृह सचिवांना सर्व माहिती देऊन  सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे, असे ते म्हणाले

 

राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर फोन टॅपिंग प्रकरणी धक्कदायक आरोप केले आहेत. आपण मुख्यमंत्र्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील फोन टॅपिंग प्रकरणाचे सर्व पुरावे दिले होते मात्र त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी काहीही कारवाई केलेली नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

२०१७ मध्ये मी मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना मला माहिती मिळालेली की मुंबईतल्या हॉटेलमध्ये डिलींग होतंय व मुंबई पोलिस अधिकारीही या डिलींगमध्ये सहभागी आहेत. मी लगेच कमिशनरना मध्ये घेतलं व त्या सगळ्यांना अटक करण्यात आली. सर्व पुरावे असल्याने ही कारवाई करण्यात आली, असं फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकरणाचा संदर्भ देत पुढे फडणवीस यांनी, जे त्यावेळी उपलब्ध होतं ते आताही उपलब्ध आहे. मात्र आपलं सरकार वाचवण्यासाठी त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय.

 

माझ्या आधी आर आर पाटील असतानाही रश्मी शुक्ला होत्या. त्या सुद्धा अनुभवी होत्या. त्यांना  मंत्र्यांची तसेच अधिकाऱ्यांची नावं समोर येत असल्याचं  समजलं. बदल्यांसाठी पोलिसांची बोलणी सुरू आहेत असंही त्यांना समजलं. त्यांनी डीजी साहेबांना सांगितलं. हे सगळे नंबर इंटरसेप्ट करायला सांगितले गेले. जेव्हा कॉल रेकॉर्डिंग सुरू झालं तेव्हा अनेक बडे अधिकारी काही राजकारणी यांची नावं चर्चेत यायाला लागली. हे सगळं लक्षात यायला लागल्यावर याचा संपूर्ण अहवाल सीओआयनं तयार केला व २५  ऑगस्ट २०२० रोजी डीजींना दिला. २६ तारखेला डीजींनी हा अहवाल सीताराम कुंटेंना फॉरवर्ड केला. २६ तारखेला हे मुख्यमंत्र्यांच्या लगेच लक्षात आणावं व सर्वसमावेशक चौकशी सीआयडीकरून करावी. त्याचप्रमाणे  गुप्तता पाळली जावी असं स्पष्ट पत्र डीजींनी लिहिलं होतं, असा दावा फडणवीस यांनी केलाय.

 

माझ्या माहितीनुसार नंतर संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती. त्यांनी चिंताही व्यक्त केली होती. मात्र पुढे काही झालं नाही असं फडणवीस म्हणाले. “६.३ जीबीचा डेटा माझ्याकडे आहे. ज्याच्यामध्ये इंटरसेप्ट केलेले सगळे कॉल्स आहेत. लेटर व कॉल्सचे ट्रान्स्क्रिप्ट मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे,” असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

 

मात्र एवढी माहिती देण्यात आल्यानंतरही काहीच कारवाई होत नाहीये असं लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून हा रिपोर्ट गृहमंत्र्यांना दिला गेला. त्यानंतर कारवाई झाली कुणावर तर कमिशनर इंटेलिजन्सवर.  त्यांचं प्रमोशन थांबवलं गेलं. त्यांच्या हाताखालच्यांना प्रमोशन देण्यात आलं, असा दावा फडणवीस यांनी केलाय. त्यांचं रेकॉर्ड अत्यंत स्वच्छ होतं. प्रमोशन द्यायला लागलं ते दिलं डीजी सिव्हिल डिफेन्स पदावर. जी पोस्टच अस्तित्वात नाहीय, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. या अधिकाऱ्यांचं प्रमोशन थांबवण्यात येण्यामागे हे रिपोर्ट इंटरसेप्शन कारणीभूत ठरल्याचा दावा फडणवीसांना केलाय. हे सर्व इटरसेप्शन चुकीचं ठरलं असतं कारण सगळे लोक उघडे पडले असते, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.  २५ ऑगस्ट २०२० पासून इतक्या महत्त्वाच्या रिपोर्टवर कारवाई का नाही झाली?, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.  ज्यांची नावं आली त्यांना तीच पोस्टिंग दिली गेली, असंही फडणवीस म्हणालेत.

Protected Content