फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार !

 

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला सोबतचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादली येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिची ओळख भादली येथील गणेश निवृत्ती सपकाळे हल्ली मुक्काम पुणे याच्याशी झाली. फेब्रुवारी २०२२ मध्ये महिलेच्या मुलीचे वाढदिवस होता. त्याच्या १५ दिवसानंतर तरुणाने महिलेची जवळीक साधत तिच्यासोबत असलेले फोटो काढले. त्यानंतर याच फोटोंचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर पुण्यात आणि तिच्या गावात वेळोवेळी अत्याचार केला.

दरम्यान या अत्याचारातून महिला गर्भवती राहिली. तसेच गर्भवती झाल्यानंतर महिलेला पुणे येथे घेऊन जाऊन तिथे गर्भपात केला. यासंदर्भात महिलेने जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी गणेश निवृत्ती सपकाळे रा. भादली ता.जि. जळगाव हल्ली मुक्काम पुणे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

Protected Content