फैजपूर प्रतिनिधी । इंदौर येथील अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री श्री राधे बाबा यांचे मंगळवार दि. १५ जून रोजी फैजपूर येथे आगमन होत आहे.
अखिल भारतीय संत समिती हिंदू धर्मातील १२७ संप्रदायांचे मोठे संघटन असून या समितीच्या माध्यमातून हिंदू धर्मातील सर्व संप्रदायांना संघटित करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. या संघटनाद्वारे देशात समरसता निर्माण व्हावी व हिंदू धर्मातील परंपरा, उत्सव, मंदिरे सुरक्षित रहावी यासाठी प्रयत्न केले जातात. या संघटनाच्या माध्यमातून हिंदू धर्मातील वेगवेगळी मान्यता असलेले सर्व संप्रदाय संघटित झाले आहेत. गौरक्षा, राष्ट्ररक्षा, गंगारक्षा ही प्रमुख उद्दिष्टे या समितीची आहेत. या समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री महामंडलेश्वर स्वामी मनमोहन दासजी उर्फ श्री राधे राधे बाबा यांचे फैजपूर येथे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांचेकडे मंगळवार सायंकाळी आगमन होत आहे. या प्रवासादरम्यान फैजपूर येथे दोन दिवस श्री राधे राधे बाबा परिसरातील सर्व संतांच्या भेटीगाठी घेणार आहे व संप्रदाय किंवा मठ मंदिरांच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. या अडचणी सरकारपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कळविले आहे.