सातारा : वृत्तसंस्था । देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी १०० कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
भाजपा-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. यात मलाही ऑफर देण्यात आली होती, असा दावा करत शिंदे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपाकडून देण्यात आलेल्या तत्कालीन ऑफरचा आज खुलासा केला. शिंदे म्हणाले,”तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. त्याचबरोबर तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपाकडून १०० कोटी रुपये खर्च केले जातील, असंही मला सांगण्यात आले होतं, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. पुढे शिंदे म्हणाले,”त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहिन. उदयनराजे हे भाजपात जात असतानाही मला ऑफर आली होती,” असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.
कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबरमध्ये रॅली काढण्यात आली होती . या रॅलीत बोलताना “राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल असं जाहीर केलं. यांच्या बापाची पेंड आहे का?,” असं म्हणत टीका केली होती. त्याला शिंदे यांनी उत्तर दिलं होतं. ““चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने चालू आहेत, याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे?,” असा सवाल केला होता. यावरून बराच वाद त्यावेळी झाला होता.
राज्यातील प्रमुख मराठा नेत्यांपैकी शशिकांत शिंदे हे एक आहेत. ते पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेत पाठवलं होतं. मुंबई आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.