मुंबई (वृत्तसंस्था) आज मी, सुनील तटकरे, आदिती तटकरे एकत्र आलो हा योगायोग नाही. पण देवेंद्र फडणवीस यांची सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आणि बिहारचे निवडणूक प्रभारी होणे हा योगायोग आहे,’ असे म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपला टोला लगावला.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या नेत्याची बैठक झाली. या बैठकीनंतर मुंडे म्हणाले की, आज झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. बैठकीत केवळ सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांगाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. अजित पवार देखील नाराज नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतसिंग प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. यानंतर त्यांना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारीपद देण्यात आले आहे. यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना हाच योगायोग असल्याचे म्हटले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. आम्ही आज बैठकीत शरद पवार यांच्याशी पार्थ पवार यांच्या विषयी कोणतीही चर्चा केली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे.