जळगाव, प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वाटचाल जेएनयु विद्यापीठाच्या दिशेने सुरू असल्याची तक्रार जळगाव जिल्हा एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे करून प्र कुलगुरू माहुलीकरांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे.
एनएसयूआयने केलेल्या तक्रारीनुसार, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गैर कारभाराबद्दल जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने वेळोवेळी झालेल्या गैर कारभाराबद्दल माहिती देण्यात आली. परंतु, विद्यापीठातील उच्च विभुषीत लोकांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून विद्यापीठाची बदनामी होईल व विद्यापीठामध्ये एकाच विचाराचे अराजकता माजेल, या प्रकारचे काम सुरू ठेवला असल्याचा आरोप केला आहे. कालच विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राध्यापक माहुलीकर यांनी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठबद्दल संदेश हा थेट एका विशिष्ट राजकीय विद्यार्थी संघटनेच्या फेसबूक लाईव्ह पेज वरती जाऊन दिला. प्रकाराने विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांमध्ये हे विद्यापीठ आहे का ? एका विशिष्ट राजकीय संघटनेचे व्यासपीठ आहे ? असा संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा अंतर्गत प्र-कुलगुरू यांनी राज्य शासनाच्या विविध अटी, शर्ती व अधिकारांचा दुरुपयोग केल्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूच्या शिफारशीनुसार प्र-कुलगुरू यांच्यावर कुलपती म्हणजेच राज्यपाल यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस प्रथमतः देऊन या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून यास जबाबदार असलेल्या प्र-कुलगुरू यांना कुलपती यांच्या आदेशान्वये पदावरून दूर करण्यात येऊ शकते. सदर प्रकारच्या बेजबाबदार कृत्याची दखल घेऊन या प्रकारास जबाबदार असलेल्या प्र-कुलगुरू माहुलीकर यांना तात्काळ पदावरून हटवावे अन्यथा जळगाव जिल्हा एनएसयुआयकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.