मुंबई प्रतिनिधी | आपली भगिनी पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने आम्ही नाराज नसून याबाबत चुकीच्या बातम्या पसरवण्यात येत असल्याचे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे म्हणाल्या की, केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते. त्यामुळे आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मंत्रीपदासाठी केवळ प्रीतम यांचंच नाही तर हिना गावित यांचं नावही चर्चेत होतं. पण नवीन लोकांनना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे, असं सांगतानाच प्रीतम ताईंचं नाव चर्चेत होतं आणि योग्य होतं. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही याचंही कारण सांगितलं. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही अभिनंदन केलं नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचं अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचंही अभिनंदन करते, असं त्या म्हणाल्या. मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचं आणि दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.