प्रशासनाचा हलगर्जीपणा : पहूर, पाचोरा हेलपाट्यानंतर ‘त्यांची’ स्वॅब चाचणी शेंदूर्णीतच

 

शेंदूर्णी,प्रतिनिधी । येथील जावई असलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या ११ निकटवर्तीयांची स्वॅब चाचणीसाठी शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र, पहूर, पाचोरा अशी फरपट झाली. त्यांच्या या हेलपाट्यानंतर अखेर शेंदुर्णीलाच त्यांची स्वॅब चाचणी घेण्यात आली.

जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी व भडगाव तालुक्यातील वलवाडीसह दोन्ही गावात २४ व २५ रोजी राहून आलेल्या व्यक्तीचा नाशिक येथे घेतलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह अहवाल असणाऱ्या व्यक्तीची शेंदूर्णी सासुरवाडी असून वलवाडी गाव आहे. शेंदूर्णीत त्या जावई बापुच्या निकटच्या संपर्कातील सर्व ११ व्यक्तींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. यात ३ महिला,४ पुरुष, ४ लहान मुले यांचा समावेश आहे. या सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पहुर येथे पाठवायचे होते. परंतु, अम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने या व्यक्तींना ताटकळत बसावे लागले. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता त्यांना पहुर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ही केवळ १० स्वॅब चाचणी कीट उपलब्ध होत्या व व्यक्ती ११ होत्या. अशाही परिस्थितीत पहुर ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा यांनी तयारी केलेली होती. पण अचानक ऐनवेळी जिल्हाच्या आरोग्य यंत्रणेच्या वरीष्ठांचा संबंधितांना पाचोरा येथे हलविण्याचा आदेश वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदा यांना आल्याने त्यांनी वरिष्ठांचे आदेशाने सर्व ११ व्यक्तींना स्वॅब् नमुने व क्वारंटाईन करण्यासाठी रात्री १०.३० वाजता पाचोरा येथे पाठविले. तेथील डॉक्टरांनी या व्यक्तींचे स्वॅब् नमुने न घेता व क्वारंटाईन न करता केवळ लक्षणे विचारले व ताप तपासणी करून घरी जाण्याचा सल्ला दिला. पाचोरा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घरी जाण्याचा सल्ला दिल्याने संबंधित ११ रुग्णांनी क्वारंटाईन सेंटर ऐवजी घरी जाण्यासाठी आग्रह धरला. याप्रसंगी घटनेचे गांभीर्य ओळखुन सामाजिक बांधीलकी म्हणुन स्थानिक पत्रकार विलास अहिरे,शेंदूर्णी येथिल पोहेकॉ किरण शिंपी व वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा व विलास सुकलाल पाटील यांनी सर्व ११ व्यक्तींची समजूत काढली आणि रात्री १२.३० च्या दरम्यान त्यांना शेंदूर्णी येथे उभारणी केलेल्या गरुड महाविद्यालयाचे महिला वसतिगृहातील क्वारेंटाईन सेंटर मध्ये विलगिकरण कक्षात भरती केले. आज दि. ३ मे रोजी सकाळी ९.३० वाजता संबंधित व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यासाठी पहुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पथक चाचणी कीट घेऊन शेंदूर्णीत आले व संबंधीत सर्व ११ संशयीतांचे स्वॅब् नमुने घेण्यात आले आहेत. पु ढील तपासणीसाठी सर्व नमुने जळगाव येथील ‘कोविड १९ रुग्णालय’ येथे पाठविणार असल्याचे डॉ.हर्षल चांदा यांनी सांगितले. आज सबंधीत संशयीत ११ जणांचा शेंदुर्णी येथेच स्वॅब घेण्यात आला असुन त्यांचे रिपोर्ट प्राप्त होईपर्यंत या सर्वांना येथेच ठेवण्याच्या सुचना जामनेर तहसिलदार अरुण शेवाळे यांनी पहुर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा करून दिल्या आहेत.

नातेवाईक पुरवीत आहेत क्वारंटाईन व्यक्तींना जेवण

विशेष म्हणजे क्वारेंटाईन केलेल्या व्यक्तींना शेंदुर्णी सेंटरवर बेड व्यतिरिक्त कुठल्याही सुविधा पुरवण्यात आली नाही म्हणून त्यांच्याच नातेवाईकांना या व्यक्तींना चहा, नास्ता,जेवण आपल्या घरून घेऊन जावे लागत आहे. यापुढे दररोज रात्री डॉ.सागर गरुड यांचे कडून भोजन पुरविण्यात येणार आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये नातेवाईक येतात त्यामुळे क्वारंटाईन व्यक्तीशी इतरांचा संपर्क येत आहे . मग विलगीकरण करून उपयोग काय ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. संस्थात्मक क्वारंटाईनसाठी लागणारी पुर्ण सेवा सुविधा व खर्च हा स्थानिक प्रशासनाने करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु, स्थानिक प्रशासनाच्या ढीम्म कारभारामुळे क्वारंटाईन केलेल्या नागरीकांची गैरसोय होत असून त्यांना कुठंल्याही सुविधा स्थानिक स्वराज्य संस्था पुरवीत असल्याचे दिसत नाही. या घटनेवरून आरोग्य यंत्रणा व कोरोना आपत्तीची जबाबदारी सोपविण्यात आलेले संबंधित सर्व अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे उजागर होत आहे. त्याचा फटकाही क्वारंटाईन केलेल्या ११ व्यक्तींना बसला असून त्यांची १७ तास हेळसांड करण्यात आली. विशेष म्हणजे नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य कळत नसल्याचे सांगणारे अधिकारी कोरोना आपत्ती सारख्या आणीबाणीच्या काळात आपले फोन बंद ठेऊन आरामात आपापल्या घरी निद्रा घेत असल्याचे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Protected Content