नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून पक्षात प्रवेश आणि जबाबदारी प्रशांत किशोर यांना देण्यास पक्ष सकारात्मक असल्याची चर्चा आहे
२०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून पिछेहाट झालेल्या काँग्रेसनं पुन्हा एकदा कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. पुढील वर्षी होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसह काँग्रेस २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून, पक्षाने आता नवीन व्यूहरचनेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातच आता प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक असून, याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान हवं आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही पर्याय काँग्रेसला सूचवले असून, आगामी काळात प्रशांत किशोर सोनिया गांधी यांचे सल्लागारपदीही दिसू शकतात.
काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत मोठे फेरबदल केले जाणार आहे. याचबरोबर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका हवी आहे. त्यासाठी त्यांनी काही पर्याय पक्षश्रेष्ठीला सूचवले आहेत.
प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरणार असल्याची वृत्त आहे. प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष सल्लागार समिती गठित करण्याची सूचना केली आहे. या समितीत जास्त सदस्य नको. ही समिती आघाडीसोबत निवडणूक प्रचार वा इतर राजकीय व्यूहरचनेबद्दल अंतिम निर्णय घेईल. निर्णय निश्चित झाल्यानंतर अखेरच्या शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ समितीसमोर मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवत जाईल, अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडली आहे.
या समितीत प्रशांत किशोर यांना स्थान हवं असल्याचं वृत्त आहे. काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठे बदल केले जाणार असल्याची कुजबूज पक्षात सुरू झाली असून, यात नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर नवीन समित्याही गठित केल्या जाणार असल्याचं पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल सोनिया गांधी चाचपणी करत आहेत. लवकरच याबद्दलचा निर्णय घेतला जाणार असून, प्रशांत किशोर यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्या राजकीय सल्लागारपदाची जबाबदीर कुणालाही दिलेली नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्याकडे राजकीय सल्लागार पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.