प्रयागराज: वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेल्या वर्षी कुंभमेळ्यात सुविधा पुरवणाऱ्या कंपनीसह ११ भागिदारांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या कंपनीने १०९ कोटींची बोगस बिले सादर केली होती.
दरम्यान, प्रयागराज कुंभमेळा प्राधिकरणाने लल्लू जी अँड सन्स या कंपनीला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे.
कुंभमेळ्यात तंबू उभारण्यासह फर्निचर आणि ध्वनिक्षेपकासह इतर सुविधा देण्यात आल्या होत्या. ही सेवा पुरवणारी कंपनी आणि इतर भागिदारांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार करून बोगस बिले सादर केली, कुंभमेळ्यातील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांच्या आधारे कागदपत्रे तयार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
अप्पर कुंभमेळा अधिकारी यांच्या तक्रारीनुसार, कुंभमेळ्यात प्रयागराज कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने तात्पुरत्या स्वरुपात शहर उभारण्यात येणार होते. त्यासाठी तंबू, फर्निचर आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी लल्लूजी अँड सन्स या कंपनीची ठेकेदार म्हणून अधिकृत नियुक्ती केली होती. कंपनी आणि त्यांच्या भागिदारांकडून २७ फेब्रुवारी २०१९ ते ६ जुलै २०१९ या कालावधीत १९६.२४ कोटी रुपयांची बिले सादर करण्यात आली होती. कोट्यवधींची बोगस बिले आणि व्हाऊचर सादर केल्याप्रकरणी अपर कुंभमेळाधिकारी दयानंद प्रसाद यांनी दारागंज पोलीस ठाण्यात कंपनी आणि भागिदारांविरोधात तक्रार दाखल केली. तपासणीदरम्यान, ८६. ३८ कोटींची बिले योग्य असल्याचे निष्पन्न झाले. तर उर्वरित १०९.८५ कोटींची बिले ही बोगस आढळली.