जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी संस्थेच्या वरणगाव येथील महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदासाठी प्रा. दिनू पाटील यांनी बेकायदेशीर व्यक्तीच्या स्वाक्षरीने बोगस प्रस्ताव पाठविला असून, या प्रस्तावला मान्यता देवू नये, असे पत्र संस्थेचे संचालक जयवंत भोईटे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविले असून पदाला मान्यता दिल्यास नाईलाजाने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी तसेच अवमानाची कारवाई करण्यात येईल, असे पत्रात नमूद आहे. या पत्रानुसार सेवाज्येष्ठता यादी सुध्दा बोगस तयार करण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बेकायदेशीर स्वाक्षरीनेच बदली
जयवंत भोईटे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बेकायदेशीर स्वाक्षरीने प्रा. दिनू पाटील यांची बदली करण्यात आली आहे . त्याच बेकायदेशीर स्वाक्षरी करणार्या व्यक्तीच्या सहीने त्यांच्या प्रभारी प्राचार्य पदाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे .आणि त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. या संस्थेच्या वैध संचालक मंडळाची माहिती आम्ही कुलगुरूंना या आधी दिलेली होती. तरीही त्या माहितीची दखल घेण्यात आली नव्हती.
संस्थेचे कायदेशीर सल्लागार यांच्यासमवेत धर्मादाय उपायुक्तांच्या कार्यलयात चौकशी केल्यावर असे समजले कि दिनू पाटील यांच्या नियुक्तीच्या आदेशावर सही करणारी व्यक्ती या संस्थेच्या वैध संचालक मंडळात नाही. 1998 आणि 2002 नंतरचे संचालक मंडळाच्या फेरफारांचे अर्ज न्यायप्रविष्ठ आहेत या संस्थेच्या संचालक मंडळाची माहिती धर्मादाय उपायुक्तांच्या कार्यालयाकडून मागवून घ्यावी आणि कुलगुरूंनी त्याची पडताळणी करून घ्यावी अन्यथा आम्हाला फौजदारी कारवाईचा विचार करावा लागेल.
प्रा. दिनू पाटील जळगाव महाविद्यालाचे कर्मचारी
प्रा. दिनू पाटील या संस्थेच्या जळगावच्या महाविद्यालयाचे कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन नुतन मराठा महाविद्यालयातून काढण्यात येत आहे. तसेच त्यांच्या बदलीबाबत तक्रार केल्याने उच्च शिक्षण सहसंचालकांनी बदलीला मान्यता दिलेली नाही. प्रा. दिनू पाटील यांचा प्रभारी प्राचार्य पदाचा प्रस्ताव पाठवितांना पाठविलेले सेवा ज्येष्ठता यादीही बोगस असल्याचे पत्रात म्हटले असून यावरुन कुलगुरुची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे विद्यार्थी व कर्मचारी हिताच्या दृष्टीने वरणगाव महाविद्यालयाच्या आस्थापनेवर कायदेशीरपणे कार्यरत असलेल्या वरिष्ठ प्राध्यापकास प्रभारी प्राचार्य पदाचा पदभार द्यावा असेही जयवंत भोईटे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.