जळगाव, प्रतिनिधी | महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१९ मधील प्रभाग क्र.१९ ‘अ’च्या पोट निवडणुकीत शुक्रवारी अपक्ष उमेदवार आशा किशोर कोळी यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार निता सोनवणे यांची निवड निश्चित झाली आहे.
अपक्ष उमेदवार आशा कोळी यांच्या अर्ज माघारप्रसंगी शिवसेना व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यात उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगसेवक कैलास सोनवणे, शिवसेना महानगर अध्यक्ष शरद तायडे, बंडू काळे यांच्यासह भाजपा, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता. प्रभाग क्र.१९ ‘अ’च्या तत्कालीन नगरसेविका लता सोनवणे यांनी चोपडा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाल्याने त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त होती. त्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार माघारीच्या शेवटच्या दिवशी आज दि. २४ रोजी कोळी यांनी माघार घेतली आहे. याबाबत मनपा विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ला माहिती दिली. याप्रसंगी, नगरसेवक नितीन लढ्ढा हे उपस्थित होते. दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.