प्रणव मुखर्जीच्या पुस्तकात काँग्रेसच्या धोरणात्मक चुकांवर बोट

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । २००४ मध्ये प्रणव मुखर्जी यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा सोपवली असती तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पाहावा लागला नसता असं काही नेत्यांचं मत होतं, असा दावा प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक ‘द प्रेसिडेन्शिअल ईयर्स’मध्ये केला आहे.

मुखर्जी यांनी निधनापूर्वी हे पुस्तक लिहिलं असून रूपा प्रकाशन द्वारे ते जानेवारी महिन्यात प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकातील काही भाग सध्या समोर आला आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी आणि मिळणाऱ्या सततच्या पराभवामुळे काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांकडूनही काँग्रेस नेतृत्वावर टीका करण्यात आली होती. परंतु आता दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकावरून पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जबाबदार धरलं आहे.

३१ जुलै रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं होतं. पुस्तकातील काँग्रेस संबंधातील त्यांनी केलेली टीका अशावेळी समोर आली आहे जेव्हा काँग्रेसमधीलच काही अंतर्गत वाद समोर येत आहे. “माझ्या पक्षातील काही सदस्यांचं असं मत होतं की २००४ मध्ये जर पंतप्रधान असतो तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसवर दारूण पराभव ओढवला नसता. परंतु या मताशी मी सहमत नाही. मी राष्ट्रपती पदी विराजमान झाल्यानंतर पक्ष नेतृत्वानं राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील प्रकरणं हाताळण्यास असमर्थ ठरत होत्या तर मनमोहन सिंग यांची संसदेतील मोठ्या अनुपस्थितीमुळे खासदासांशी त्यांच्या वैयक्तीक संबंधांवरही पूर्णविराम लागला,” असा दावा प्रणव मुखर्जी यांनी केला आहे.

माझा असा विश्वास आहे की शासन करण्याचा नैतिक अधिकार हा पंतप्रधानांवर आहे. देशातील संपूर्ण शासन व्यवस्था पंतप्रधान आणि त्यांच्या प्रशासनाच्या कामकाजातून दिसून येते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आघाडी वाचवण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि तो शासनावर भारी पडत गेला. दरम्यान, या पुस्तकात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाच्या पद्धतीवरही भाष्य केलं आहे.

या पुस्तकात पश्चिम बंगालच्या एका गावात प्रणव मुखर्जी यांनी घालवलेल्या बालपणापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करण्यात आलं आहे. रूपा प्रकाशनद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत असून जानेवारी २०२१ मध्ये जगभरात हे पुस्तक उपलब्ध असेल असंही प्रकाशकांकडून शुक्रवारी सांगण्यात आलं.

Protected Content