यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील पोलीस वसाहतच्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून महसूल विभागाकडून जप्त केलेली गौण खनिजाची वाहने अस्ताव्यस्त लावलेली असल्याने वाहनांचे आजूबाजूला अनावश्यक गवताची वाढ झाल्याने पोलीस वसाहतीतील कुटुंबीयांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
आज गुरुवार, दि. ८ सप्टेंबर रोजी पोलीस कुटुंबीयांनी तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निवेदन सादर करत परीसरातील वाहने व परिसराची स्वच्छता करून न दिल्यास पोलीस कुटुंबीयांकडून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलनापासून पोलीस अलिप्त असतात मात्र पोलीस वसाहतीच्या विविध नागरी समस्यांना कुटुंबीयांना तोंड द्यावे लागत असल्याने महिलांनी समस्याला वाचा फोडण्यासाठी थेट तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन गाठत समस्यांचा पाढा वाचला.
येथील पोलीस वसाहतीत सुमारे २० कुटुंब वास्तव्यास आहेत. पोलीस वसाहतीच्यासमोर असलेल्या आवारात महसूल विभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून जप्त केलेली वाहने लावून ठेवलेली आहेत. या वाहनांच्या आजूबाजूला अनावश्यक वनस्पतीसह गवताची वाढ झाल्याने व सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने रात्री अपरात्री पोलीस वसाहतीत जाण्यासाठी धोक्यात जीव घालवावा लागत असल्याची समस्या आहे.
वाहने अस्ताव्यस्त लावली असल्याने या परिसराशी स्वच्छता होत नसल्याने तसेच परिसरात पावसाचे पाण्याची मोठ मोठे डबकी साचल्याने दुर्गंधी सुटत असून डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आरोग्य धोक्यात आहे. तसेच पोलीस वसाहतीला संरक्षण भिंत नसल्याने व वेळेवर गटारीची साफसफाई होत नसल्याने डुकरांचा वसाहती त्रास वाढलेला आहे.” या सर्व समस्यांचे कथन वसाहतीतील महिलांनी गुरुवारी येथील तहसीलदार महेश पवार यांना केले.
अनेक वर्षापासून जप्त केलेली वाहने बेवारस पडलेली असल्याने व त्यांना नंबर प्लेट नसल्याने वाहनांचा लिलाव करण्यास अडचण होत असल्याची माहीती पत्रकारांशी बोलतांना तहसीलदार महेश पवार यांनी ही अडचण सांगत वाहनांचे चेसिस नंबर पोलिसांनी तपासून तहसील कार्यालयास पाठवावी जेणेकरून महसूल विभागाला जप्त केलेल्या या वाहनांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करता येईल. असे ही सांगितले.
महिलांनी मात्र ही वाहने हटवली नाही तर पोलीस कुटुंबीयांकडून थेट तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. तहसीलदार पवार यांची भेट घेतल्यानंतर महिलावर्गांनी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांची भेट घेत परिसरात लावलेल्या बेवारस वाहनांमुळे कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी तातडीने संबंधित विभागाशी व प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी पोलीस कुटुंबीयांना दिले.