जळगाव प्रतिनिधी । शहरातील पोलीस लाईनमध्ये राहत्या घरात किचनमध्ये आतून कडी लावून अडकलेल्या १८ महिन्याच्या बालकाला अग्निशमन विभागाच्या जवानांनी चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढल्याची घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. यासाठी अग्निशमन विभागाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
या संदर्भात वृत्त असे की, अरूण विश्वनाथ पाटील हे पोलीस मुख्यालयात शिपाई आहे. ते पोलीस लाईनमध्ये कुटुंबियासह राहतात. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अरूण पाटील याचा १८ महिन्याचा मुलगा स्वयंम हा किचनमध्ये जावून आतून कळी लावून अडकला. हा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने परिसरातील नगरीकांना बोलावले. नागरीकांनी क्षणाचाही विलंब न करता, अग्निशमन अपत्कालिन विभागाच्या पथकाशी संपर्क साधला. अग्निशमन काही वेळात पोलीस लाईनच्या बिल्डिंग १४४ जवळ दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रोलिक टॅम्बो स्टूल आणि डोअर ब्रेकरच्या सहाय्याने चिमुकल्याला कोणतीही इजा न करता सुखरूप बाहेर काढले.
याकामी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटिल यांनी ही कामगिरी केली.