जळगाव प्रतिनिधी । पोलिस यंत्रणेवर मोठा ताण कमी करण्यासाठी राज्यात पोलिस पाटीलांची मोठी मदत करणारे पोलिस पाटील यांचे गेले पाच महिन्याचे मानधन रखडले असून त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येत असल्याने तात्काळ रखडलेले मानधन देण्यात यावे अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे पत्राद्वारे केली आहे.
आपल्या पत्रात खासदार उन्मेश पाटील यांनी पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, वन विभाग, कृषी विभाग व सध्या स्थितीत आरोग्य प्रशासनाच्या कामकाजात योगदान देत आहेत. गावातील आरोग्य समितीचा पदसिद्ध सदस्य म्हणून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस पाटीलांची महत्वाची भूमिका आहे. गावात २४ तास कर्तव्यावर असलेल्या पोलिस पाटील यांना गेल्या पाच महिन्यापासून मानधन देण्यात आलेले नाही. यामुळे पोलिस पाटील यांच्याध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. कोरोना महामारीमध्ये रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष काम करणारे पोलिस पाटील हे विमा संरक्षणापासून वंचित राहिले आहेत. लॉकडाऊन काळात आर्थिक मानधन न मिळाल्याने उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.
यामुळे राज्य शासनाने राज्यातील सुमारे २७ हजार पोलिस पाटील यांना विमा कवच द्यावे पोलिस पाटील यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता गेल्या पाच महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता तात्काळ द्यावा. आपण राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री म्हणून तात्काळ आदेश द्यावेत अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.