जळगाव, प्रतिनिधी । वृद्ध महिलेच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष न देता तपासात निष्काळजीपणा करून सदर महिलेच्या मृत्यूस रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे तितकेच जबाबदार पोलीस निरीक्षक अकबर पटेल व स्थानिक पोलिस प्रशासन आहेत. कोविड रुग्णालयाच्या सर्व गलथान कारभाराची चौकशी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झालटे यांनी इ-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयात येथे पाच ते सहा दिवसापासून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा शौचालयात कुजलेल्या अवस्थेत दुर्गंधीमुळे मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. कोविड-१९ या रोगाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड संवेदनशील असताना इतक्या अक्षम्य हलगर्जीपणा होतोच कसा याचे असा प्रश्न वैशाली झालटे यांनी उपस्थित केला आहे. मी एक सुज्ञ नागरिक व कायद्याची विद्यार्थिनी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून मला असे वाटते की, ज्या दिवसापासून सदरची वृद्ध महिला बेपत्ता झाली त्याच दिवशी रुग्णालय प्रशासन आणि वृद्ध महिलेच्या नातेवाईक यांनी ती महिला बेपत्ता झाल्याची तक्रार जिल्हा पेठ पोस्ट येथे दिलेली होती. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी सदरची तक्रार येताच क्षणी रुग्णालयात भेट देऊन सदर जागेचा पंचनामा करून तसा अहवाल पाठवणेअपेक्षित होते. त्यांनी पंचनामा न करता रुग्णालयात प्रशासनास सीसीटीव्ही फुटेज मागून स्वतःची आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाहीत म्हणून जबाबदारी पूर्णपणे झटकून तपासात नक्की दिशा मिळत नाही असे अत्यंत बेजबाबदारपणे ते वागलेले आहेत. कदाचित त्यांनी पंचनामा केला असेल पण पंचनामामध्ये घटनास्थळा जवळ असलेले शौचालय का तपासले नाही. एक तपासी अधिकारी किंवा प्रभारी अधिकारी या नात्याने त्यांनी आजुबाजूचा परिसर पिंजून काढला नाही. यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो गौरव होत होता त्या गौरवला पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी काळिमा फासला आहे. माझी पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी सदर वृद्ध महिलेच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष न देता तपासात निष्काळजीपणा करून सदर महिलेच्या मृत्यूस रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे तितकेच जबाबदार पोलीस निरीक्षक अकबर पटेल आहेत म्हणून माझी पोलीस निरीक्षक पटेल यांच्याविरुद्ध रितसर फिर्याद आहे तसेच सदर घटनेस त्यांना जबाबदार धरून पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांना पोलिस खात्यातून तात्काळ बडतर्फ करावे ही विनंती. याचबरोबर शासनाने कोविड रुग्णालयाच्या सर्व गलथान कारभाराची चौकशी करावी. .ह्यावर लक्ष केंद्रित केलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयात शासनाविरुद्ध पिटीशन दाखल करणार असल्याचे झालटे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वैशाली झालटे यांच्या इ-मेलची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून त्यांचा मेल हा पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागात पाठविण्यात आले असल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे.