मुंबई : वृत्तसंस्था । पोलीस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं काम कुणी करत असेल, जनतेच्या मनातून पोलीस दलाला उतरवण्याचं काम कुणी करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
माजी आमदार आसिफ शेख रशीद यांच्या पक्ष प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांनी संवाद साधताना हे मत व्यक्त केलंय.
अजित पवार म्हणाले, “रश्मी शुक्लांचे पत्र काय आहे? सुबोध जैस्वाल यांचे पत्र काय आहे? यादी दिलीय त्याबाबत बोलण्यात आले आहे. मी काही आज प्रशासनात काम करत नाही. गेली 30 वर्षे प्रशासन सांभाळत आहे. “पोलीस बदल्यांचं रॅकेट आहे असं बोललं जात आहे. त्यात कुणाकुणाची नावे येत आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्याच्यात नावं आहेत. यादी आहे त्या यादीत नावं टाकली त्यांच्या बदल्या झाल्या का? त्यांची कागदपत्रे दाखवू का?” अशी विचारणा अजित पवार यांनी केली.
‘अजित पवार म्हणाले, “जी वस्तुस्थिती आहे, जे खरं सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर 100 टक्के येईल. काळजी करण्याचं कारण नाही. गेले काही दिवस राज्यात जे काही वातावरण तयार करण्यात आले. त्यामध्ये कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. चौकशा सुरू आहेत. NIA सुध्दा चौकशी करतेय आणि ATS सुध्दा करत होती. परंतु काल ठाणे कोर्टाने NIA कडे तपास देण्यास सांगितले. आम्हाला भेदभाव करायचा नाही, मात्र काही बाबतीत चौकशी करण्याची गरज असेल तर केली जाईल.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अजितदादांनी दिली आहे.
रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त असताना, कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे, सनदी अधिकाऱ्यांचे; काही पत्रकारांचेही फोन टॅप केले होते काय, याचा माग आता सरकारकडून काढला जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण घडले तेव्हा सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा अहवाल महाविकासआघाडीसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
विरोधकांनी कितीही आरडाओरड केली, आरोप केले तरी राज्य सरकार नियमानुसार काम करत आहे. विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं सांगत राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, असं अजित पवार म्हणाले.
विरोधक सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहे. पण मला त्यांना सांगायचंय की महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्या मित्रपक्षाचे आमदार आमच्यासोबत आहे. साहजिकच महाविकास आघाडी पूर्णबहुमताने सत्तेत आहे, असं अजित पवार म्हणाले.
अधिकारी बदल्यांच्या रॅकेटवरुन विरोधी पक्ष आरोप करतो आहे. पण त्या बदल्या झाल्याचं नाहीत, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. ज्या बदल्या रश्मी शुक्ला यांनी सांगितले त्या बदल्या झालेल्या नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याचं नाव येईल त्याची चौकशी केली जाईल, असं म्हणत रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे संकेत अजित पवार यांनी दिले.