मुंबई : वृत्तसंस्था । गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांवर दबाव टाकणं योग्य नाही, असे सांगत या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. असा विरोधी पक्षनेत्यांना इशारा दिला.
पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले व यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले असता तेथील चर्चेनंतर अधिकाऱ्याला सोडण्यात आलं. या सर्व घडामोडीमोडींच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईत जवळपास ५० हजार रेमडेसिवीर येत आहेत. चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी काल पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं असता, त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व त्यांचे अन्य सहाकारी त्या ठिकाणी पोहचले. यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या व्यक्तीला या ठिकाणी का व कशासाठी बोलावलं गेलं आहे. पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्त एवढंच सांगू इच्छितो अशाप्रकार पोलिसांवर दबाव टाकणं हे योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.”
कारवाई संदर्भात मी आमच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करतो आहे आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. अशी देखील यावेळी गृहमंत्र्यांनी माहिती दिली.