नोएडा: वृत्तसंस्था । गैरवर्तणूक केल्याने गौतमबुद्ध नगर पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची माफी मागितली आहे. डीएनडीवर पोलिसांनी प्रियांका गांधी यांचा कुर्ता पकडून त्यांना खेचले होते. त्यावेळी प्रियांका गांधी व राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत दिल्लीहून हाथरसला जात होत्या.
या घटनेनंतर सोशल मीडियावर त्या प्रसंगाबाबतचा फोटो व्हायरल झाला होता. सोशल मीडिया आणि लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर प्रियांका गांधी यांच्याशी गैरवर्तणूक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे नोएडा पोलिसांनी म्हटले आहे. चौकशी वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यामार्फत केली जाणार आहे.
हाथरसला रवाना होत असताना डीएनडीवर गोळा झालेले काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. प्रियांका गांधी पुढे जात होत्या. त्यांना रोखण्यासाठी महिला पोलिसांऐवजी पुरूष पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात पुरूष पोलिस अधिकारी प्रियांका गांधी यांची कुर्ता हाताने मजबुतीने पकडून त्यांना रोखून धरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
या प्रकाराची समाजमाध्यमांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या नोएडा पोलिसांनी माफीनामा जारी केला. नोएडा पोलिसांनी ट्विट केले आहे. नोएडा पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत खेद आहे. ही घटना मोठ्या गर्दीला नियंत्रण करत असताना घडलेली आहे. आम्ही प्रियांका गांधी यांच्याकडे खेद व्यक्त करत आहोत. पोलिस उपायुक्त मुख्यालयाने दखल घेतली असून वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाईल. या चौकशीनंतर दंडात्मक कारवाई केली जाईल. आम्ही महिलांच्या सन्मानासाठी कटिबद्ध आहोत, असे नोएडा पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
डीएनडीवर झालेल्या लाठीचार्जबाबत विचारले असता, अपर पोलिस आयुक्त लव कुमार यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून राहुल गांधी यांच्यासोबत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. नियमानुसार पोलिसांनी त्यांना रोखले. मात्र त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली.