पहूर. ता.जामनेर प्रतिनिधी । येथे तोंडाला मास्क न लावल्याने जाब विचारल्याच्या कारणावरून एका युवकाने ज्येष्ट नागरिकास मारहाण केल्याची घटना आज सकाळी बसस्थानक परिसरात घडली. याची पोलिसांनी तक्रार न घेतल्याने संतप्त नागरिकाने पहूर बसस्थानक परिसरातील शिवसेनेच्या झेंड्यासमोर डबक्यात बसत गांधिगिरी करून अखेर पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले.
याबाबत वृत्त असे की, पहूर येथील ज्येष्ठ शिवसैनिक शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी पहूर कसबे येथीलच अनिकेत कडूबा चौथे यास मास्क लावण्यास सांगीतले असता त्यास याचे वाईट वाटल्याने त्याने शिविगाळ करत बेदम मारहाण केली.त् या ठिकाणी कर्तव्य बजावणारे पोलिस धाऊन आले असता अनिकेतने तेथून पळ काढला. रंगनाथ महाराज या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना पोलिसांनी बाहेर काढले. याचे वाईट वाटल्याने रंगनाथ महाराज यांनी डबक्यात बसून आंदोलन सुरू केले. आरोपी पकडत नाही तो पर्यंत उठणार नाही अशी भुमिका घेतली. या घटनेची पत्रकारांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांना खबर दिली. त्यांनी तात्काळ येऊन आरोपीस पोलिसी खाक्या दाखवत अटक करुन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तेव्हा शिवभक्त रंगनाथ महाराज यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी पाणी पाजल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, पहूरसह परिसरात आज या अनोख्या आंदोलनाची चर्चा सांगलीच रंगली आहे.