पोलिसांच्या माहितीवर बातम्या आल्या तर बदनामी कशी?; हायकोर्टाचा शिल्पाला सवाल

 

मुंबई : वृत्तसंस्था । माध्यमांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर राज कुंद्रा चौकशीविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या तर बदनामीचा दावा कसा होऊ शकतो?,’ असा प्रश्न न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे वकील अॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना विचारला .

 

 

 

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर समाजमाध्यमे व संकेतस्थळांवरून मानहानीकारक माहिती प्रसिद्ध करण्यास मज्जाव करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेत शिल्पाने समाजमाध्यमांसह वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांना प्रतिवादी केले होते. राज कुंद्राचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळल्यानंतर शिल्पाने ही याचिका केली होती. दरम्यान या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

 

माध्यमांमध्ये दिलेल्या बातम्या या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून आहेत. त्याला आव्हान कसं दिलं जाऊ शकतं? तो बदनामीचा प्रकार कसा म्हटला जाऊ शकतो? हे म्हणजे शिल्पा शेट्टीविषयी काहीच बोलू नका, असं सांगण्यासारखं आहे. शिल्पा शेट्टी या सार्वजनिक जीवन जगत आहेत. त्यांच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य असते असेही न्यायालयाने म्हटले आहे

 

हायकोर्टाने वकील अॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना सांगितले की, तुमच्या अशीलच्या पतीविरोधात गुन्हा दाखल आहे आणि हे कोर्ट कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. कोणीही आपला अशील असू शकतो, परंतु बदनामीसाठी कायदा आहे.

 

वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी संबंधित वृत्त अधिक रंजक करून प्रसिद्ध केले जाते, त्यामुळे प्रतिवाद्यांना आपल्याविषयी चुकीचे आणि मानहानी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यापासून मज्जाव करण्याची मागणी शिल्पाने याचिकेत केली होती. आपल्याबाबतची चुकीची माहिती संकेतस्थळांवरून काढून टाकावी, समाजमाध्यमावरूनही याबाबतचे व्हिडिओ हटवण्यात यावेत, माफी मागण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिल्पाने केली होती.

 

Protected Content