भुसावळ : प्रतिनिधी । शहरातील व्यापाऱ्यांनी आता पोलिसमित्र बनून रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे पोलिसांवरील तणाव थोडाफार कमी होण्यास मदत होणार आहे
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व दुकानें बंद आहेत. त्या बंद दुकानांमधून रात्रीच्या वेळेस चोरी होण्याची शक्यता असते. शिवाय सद्यस्थितीमध्ये पोलीस दलदेखील लॉकडाऊन बंदोबस्तामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे पोलिसांना व्यापारी वर्गाकडून पोलीस मित्र म्हणून रात्र गस्तीसाठी मदत मिळाल्यास ते संभाव्य चोरीच्या घटना रोखण्यासाठी फायद्याचे ठरू शकेल यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी व्यापारी पोलीसमित्र ही संकल्पना दोन दिवसांपूर्वी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीमध्ये मांडली होती .
या संकल्पनेला व्यापारी वर्गातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला व काल रात्री अंमलबजावणीस प्रत्यक्षात सुरुवात झाली. व्यापारी पोलीसमित्र यांनी काल रात्री साडे अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष पोलिसांसोबत पायी गस्त घातली विशाल वाधवानी , सनी वाधवानी , राहुल दोदानी , अजय नागराणी , प्रकाश चांदवानी , केशव गेलानी यांचा या गस्ती पथकात समावेश होता
व्यापारी पोलीस मित्रांच्या दोन टीम करून त्यांना मुख्य बाजारपेठेमध्ये पोलीस अंमलदार सोबत देऊन पायी गस्त देण्यात आली होती. ती त्यांनी जबाबदारीने पार पाडली. एपीआय अनिल मोरे यांनी रस्ते दरम्यान भेटी देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या .
एपीआय कृष्णा भोये, एपीआय अनिल मोरे , एपीआय धुमाळ, एपीआय हरीश भोये हे पोलीस अधिकारी दररोज या व्यापारी पोलीस मित्रांना रात्रगस्त दरम्यान भेट देऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देणार आहेत.यापुढेही दररोज व्यापारी पोलीस मित्र ही संकल्पना भुसावळ शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. व्यापारी वर्गाकडून देखील या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.