नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातील ११ राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला काहीही चमत्कार दाखवता आला नाही. लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पूर्ण ताकदीने कमबॅक करणार अशी अपेक्षा होती.
एकीकडे भाजपने दिवाळी साजरी करत बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याविरोधात अँटी इन्कम्बन्सीची लाट असतानाही स्पष्ट बहुमत मिळवलं. दुसरीकडे मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या महत्त्वाच्या राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला काहीही करता आलं नाही. मध्य प्रदेशात तर काँग्रेसकडे मोठी संधी होती.
११ राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये मतदारांनी सत्ताधारी पक्षावरच विश्वास दाखवला. एकट्या मध्य प्रदेशातील २८ पैकी १९ जागा भाजपने जिंकल्या. तर उर्वरित १० राज्यांमध्ये भाजपने लढवलेल्या २५ पैकी २१ जागांवर विजय मिळवला. गुजरातमध्ये भाजपने सर्वच्या सर्व ८ जागा जिंकल्या, तर उत्तर प्रदेशातही ७ पैकी ६ जागांवर भाजपने झेंडा फडकवला. काँग्रेसने छत्तीसगड, झारखंड आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला, गुजरात, उत्तर प्रदेश, ओदिशा आणि कर्नाटकात पराभव स्वीकारावा लागला. मणिपूरसारख्या छोट्या राज्यातही भाजपने दणदणीत विजय मिळवला. ४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने ३, तर एका भाजप समर्थित उमेदवाराने विजय मिळवला.
गुजरातमध्ये येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि त्यानंतर काही दिवसात विधानसभा निवडणूकही आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व जागांवर पराभव होणं काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला ७ पैकी एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशातील ७ जागांसाठी भाजपला सर्वाधिक ३६.७३ टक्के मते मिळाली, दुसऱ्या क्रमांकावर २३ टक्क्यांसह सपा आणि त्यानंतर १८ टक्क्यांसह बसपा आहे. या मोठ्या राज्यात थेट चौथ्या क्रमांकाची मतं मिळवणं काँग्रेससाठी चिंतनाचा विषय आहे.
भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यातील सत्ता गमवावी लागली. दिल्लीतही पराभव झाला आणि झारखंडमध्येही सत्ता राखता आली नाही. त्यामुळे बिहारची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची बनली होती. बिहारमध्ये एनडीएने स्पष्ट बहुमत तर मिळवलंच, पण इतर राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही मोदी मॅजिक कायम असल्याचं दाखवून दिलं. पोटनिवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील कामगिरीने तर भाजपच्या आगामी वाटचालीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
कोरोना नंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने केंद्रातील मोदी सरकारविषयीच्या लोकभावना या निवडणुकीतून प्रकट होणार हे स्पष्ट होतं. पण मतदारांनी सत्ताधारी पक्षावरच विश्वास दाखवला. .