मुंबई प्रतिनिधी । आधी काँग्रेस-राष्ट्रवादीत तर सध्या भाजपमध्ये असणार्या सहकार्यांनी पुन्हा परत यावे असे आवाहन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माजी आमदार राजीव आवाळे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर ते बोलत होते.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर पत्रकारांशी बोलतांना अजित पवार यांनी आपल्या माजी सहकार्यांना आवाहन केले.
पवार म्हणाले की, पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना निर्माण व्हायला लागली आहे. जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विविध पक्ष, प्रांत आणि समाजघटकातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. मागील वेळेस विरोधकांकडून अनेक प्रलोभने, आमिषे दाखवून आमच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या पक्षात नेण्यात आले. काही लोकांना भीती दाखवून फोडण्याचा प्रयत्न झाला. आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजून अनेक नेते तिकडे गेले होते. पण आता त्यांनाही आपण आघाडी सोडून का गेलो? असे वाटायला लागलेय, अशी स्थिती असल्याचे अजित पवार म्हणाले.