पूर्ण २०२१ साल कोरोनाच्या मुकाबल्यातच जाणार

 

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था । कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी सातत्याने त्यात वाढ होत आहे. भारत, ब्राझील, अमेरिकेत बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूतही वाढ होत आहे. कोरोनाला अटकाव करणाऱ्या लशीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे लस मिळाली तरी पुढील २०२१ वर्षाच्या अखेरपर्यंत जनजीवन विस्कळीत राहणार असल्याचे अमेरिकेचे संसर्गजन्य रोग तज्ञ अँथोनी फॉसी यांनी सांगितले.

फॉसी हे एका वेबिनारमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटले की, कोरोनापूर्व काळासारखे जनजीवन होण्यास बराच वेळ लागणार आहे. पुढील वर्षअखेरही सामान्य जनजीवन पूर्वपदावर येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. लस विकसित झाल्यानंतर संपूर्ण जग पूर्वपदावर येईल असे अनेकांना वाटते. मात्र, ज्या वेगाने जग पूर्ववत होईल असे वाटतेय, तसे बिलकूल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेत संसर्गाने हाहाकार माजवला आहे. अमेरिकेतही संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाकडून या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लशीच्या आपात्कालीन परिस्थितीत लस वापराला मंजुरी मिळू शकते अशी माहिती अँथोनी फॉसी यांनी दिली. मात्र, लस सगळ्यांसाठीच तात्काळ उपलब्ध होणार नाही. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लशीकरण मोहिमेसाठी वेळ लागणार असून पुढील वर्षानंतर ही लशीकरण सुरू राहू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला.

Protected Content