जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुस्तक हे अनेक विषयांचे, माहितीचे मंथन आहे. ते आपले खरे मित्र आहेत. वाचन केल्याने विचार समृद्ध होतात. यासाठी शिक्षकांनी लेखन, वाचन, आणि संशोधन कार्य सतत करत राहावे त्यामुळे शिक्षक हा शिक्षित होऊ शकतो, नवीन ज्ञानाशी सांगड घालू शकतो असे विचार के. सी. ई सोसायटी संचालित पी.जी.कॉलेजचे प्राचार्य व्ही. एस. झोपे यांनी मांडले.
के. सी. ई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालायात शिक्षण समृद्धी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्रा. डॉ. शैलेजा भंगाळे, प्रा डॉ. स्वाती चव्हाण लिखित ” शिक्षण समृद्धी” या पुस्तकाचे बुधवार १२ रोजी प्राचार्य व्ही. एस. झोपे यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यता आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्रा. डॉ. शैलेजा भंगाळे, प्रा. डॉ. स्वाती चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक राणे उपस्थित होते. त्यांनी मनोगतात पुस्तक वाचन म्हणजेच ज्ञान संपादन करणे आहे. आजची पिढी ज्ञान संपादन करते पण अधिक वाचन करण्यास तशी पुस्तक निर्मित होणे गरजेचे आहे असे सांगितले. या पुस्तकावर प्रा. डॉ. शैलेजा भंगाळे यांनी प्रकाशझोत टाकला. या पुस्तकात जे लेख आहेत ते स्वातंत्रोत्तर आणि स्वातन्त्र्यापूर्वीच्या शिक्षणकार्याचा उहापोह विविध लेखातून मांडला आहे. सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. स्वाती चव्हाण यांनी केले. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.