सांगली : वृत्तसंस्था । भाजपने लोकमताचा अनादर करीत काही राज्यांतील सत्ता हस्तगत केली, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात सांगलीतून झाली. ही चांगली घटना आहे. आता सर्वांना विश्वासात घेउन विकासाची कामे करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी दिला.
सांगली महापालिकेत बहुमत असतानाही भाजप उमेदवारांचा पराभव करीत काँग्रेसच्या मदतीने सत्तांतर घडवून आणल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासोबत शनिवारी पवार यांची बारामती येथे भेट घेतली.
या वेळी पवार यांनी सत्तांतरावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीची माहिती विचारून घेतली. महापौर निवडीवेळी किती सदस्यांनी आघाडीला मतदान केले, किती गैरहजर राहिले याची विचारणा केली. आघाडीला मदत करणाऱ्यांनाही विकासकामे करीत असताना विश्वाासात घ्या, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. भाजपने ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर हल्ले करीत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले, त्यांना चोख प्रत्युत्तर सांगलीतून मिळाले असून ही सुरुवात आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे याही उपस्थित होत्या.
सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी खा. शरद पवार यांची भेट घेऊन सत्तांतरावेळी घडलेल्या घडामोडीची माहिती दिली. या वेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे या उपस्थित होत्या.