पुणे वृत्तसंस्था । पुण्यात ‘कोरोना’ संशयित रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता आहे.
बोपोडी भागात असलेले हे खासगी रुग्णालय सध्या पुणे महापालिकेच्या ताब्यात आहे. संबंधित तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात आणले होते. दुपारी तपासणीसाठी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यानंतरही तो तणावग्रस्त होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास तरुणाने स्वच्छतागृहात जाण्याचे कारण सांगितले आणि तो खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन त्याने आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने त्याने अविचारी निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.