पुण्यात क्वारंटाईन केंद्रातील महिलेचा सुरक्षारक्षकाकडून विनयभंग

पुणे वृत्तसंस्था । पुण्यातील सिंहगड रोड परिसरात क्वारंटाईन केंद्रात तेथील सुरक्षारक्षकानेच एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित सुरक्षारक्षकाने या महिलेला वारंवार मिस्ड कॉल, अश्लील फोन-मेसेजस करुन मानसिक त्रास दिला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.

लोकेश मते असे संशयित आरोपीचे नाव आहे. पुण्यात सिंहगड रोड परिसरात क्वारंटाईन केंद्र आहे. या ठिकाणी महिलांनाही क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूकही करण्यात आली. मात्र, सध्या या क्वारंटाईन केंद्रातील महिला कक्षात ही महिला एकटीच उपचार घेत होती. याचाच फायदा घेऊन महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच या महिलेचा विनयभंग केला. यामुळे एकच खळबळ उडाली. संबंधित सुरक्षारक्षकाने महिलेला मध्यरात्रीच्या वेळी त्रास दिला. 16 जुलै रोजी लोकेश मते हा सुरक्षा रक्षक मध्यरात्रीच्या वेळी क्वारंटाईन केंद्रातील महिला कक्षात गेला. तेथे आपण सुरक्षेच्या कारणास्तव असल्याचे सांगून महिला रुग्णाचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याने या महिलेला मिस कॉल केला. आरोपीने सकाळपर्यंत खोलीचा दरवाजा ठोठावून त्रास दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी लोकेश मते याला अटक केली आहे.

Protected Content