पुण्यातील वारजे पुलाखाली कामगारांची मोठी गर्दी; पोलीसांकडून लाठीमार

पुणे वृत्तसंस्था । लॉकडाऊनमध्ये पुण्यात आडकलेल्या कामगारांनी कोणत्या वेबसाइटवर माहिती भरावी, त्याच्या लिंक व इमेल आयडीची माहिती घेण्यासाठी वारजे पुलाखाली आज सकाळी अचानक कामगारांनी मोठी गर्दी केली होती. गावी जाण्यासाठी परवानगी दिल्याचे कळाल्यामुळे काही मजूर व कामगार आले होते. वारजे माळवाडी पोलीसांनी याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वारजे पुलाजवळ येवून कामगारांवर लाठीचार्ज करावा लागला.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देश लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक कामगार पुण्यात अडकले आहेत. शासनाने अशा कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आता परवानगी दिली आहे. सध्या या कामगारांना गावी जाण्यास अर्ज करण्यासाठी ई-मेल व वेबसाइटची लिंक देण्यात आली आहे. वारजे पोलिसांनी याबाबतच्या माहितीच्या प्रती काढून वारजे पुलाखाली लावल्या होत्या. त्याची माहिती मिळताच वारजे परिसरातील अनेक कामगारांनी पुलाखाली सकाळी गर्दी केली. तसेच, काही जणांस गावी जाण्यास परवानगी दिली जात असल्याचे कोणी तरी सांगितले. त्यामुळे अनेक कामगारांनी तिकडे धाव घेतली. वारजे पुलाखाली पाचशेपेक्षा जास्त कामगार जमा झाले. त्यामुळे सुरक्षित वावर करण्याच्या आदेशाचे उल्लंघन झाले.

वारजे माळवाडी पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, जमाव मोठा असल्यामुळे पोलिसांनी काही जणांस लाठ्यांचा प्रसाद देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमाव पांगला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

Protected Content