पुणे प्रतिनिधी । पुणेरी पगडीवरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवीदान समारंभात वाद झाला असून काही विद्यार्थ्यांनी खेचराला पगडी घातल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबतचा वृत्तांत असा की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदवीदान समारंभासाठीचा ब्रिटीशकालीन पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटीशकालीन काळा घोळदार गाउन व गोल टोपीऐवजी कुर्ता, पायजमा व उपरणे असा पोशाख निश्चित करण्यात आला होता. मात्र, काही विद्यार्थी संघटनांनी डोक्यावर पुणेरी पगडी घालण्यास विरोध दर्शवला. यातच विद्यार्थी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी पुणेरी पगडीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे-पाटील आणि कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून एका खेचराला पुणेरी पगडी घातली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले. या प्रकरणी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.