पुढील किमान दहा वर्षे तरी कोरोना राहणार!

 

 

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । कोरोनाचा संसर्गाचा जोर कमी जास्त होत राहणार कोरोना आपल्यासोबत पुढील १० वर्षे तरी राहिल असे बायोएनटेकचे सीईओ डॉ. उगुर साहिन यांचे म्हणणे आहे

जगभरात कोरोना संसर्गाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे कोरोनावर लस विकसित करण्यात काही औषध कंपन्यांना यश आले आहे. तर, काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यातही आली आहे. त्यामुळे लशीमुळे कोरोना जाणार असल्याची विश्वास व्यक्त होत असला तरी कोरोनापासून इतक्यात सुटका होणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. फायजरसह कोरोनावर लस विकसित करणारे बायोएनटेकचे सीईओ डॉ. उगुर साहिन यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्यांना जनजीवन सामान्य कधी होईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना, आपल्याला सामान्य या शब्दाची नवी व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. कोरोनापासून इतक्यात आपली सुटका होणार नाही, ही वास्तविकता स्विकारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाचे थैमान जगभरात सुरू आहे. नाताळ सणाच्या काही दिवसआधीच नवा स्ट्रेन आढळल्याने ब्रिटनसह काही देशांमधील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. जगभरात संसर्गामुळे आतापर्यंत १७.५० लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, सात कोटी ९० लाखांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक फैलावला असून एक कोटी ८७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आहेत. तर तीन लाख ३० हजार जणांना प्राण गमवावे लागले आहे.

कोरोनाच्या थैमानाला अटकाव करण्यासाठी ब्रिटन, अमेरिका, रशियामध्ये लसीकरण सुरू करण्यात आले असताना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या प्रकाराने आणखी चिंता वाढवली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनाचा नवा स्ट्रेन हा वेगाने फैलावत आहे. त्यामुळे पुढील वर्षी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भीती असून रुग्णालयांत जागा कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या वाढण्याचा धोका आहे.

‘ब्लूमबर्ग’च्या एका अहवालानुसार, लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅण्ड ट्रॉपीकल मेडिसीनच्या सेंटर फॉर मॅथमॅटिकल मॉडलिंग ऑफ इन्फेक्शियस डिसीजने याबाबत एक संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसार, कोरोनाचा नवा स्ट्रेन हा इतर स्ट्रेनच्या तुलनेत ५६ टक्के अधिक संसर्गजन्य आहे. मात्र, अद्यापही या नव्या स्ट्रेनमुळे गंभीर आजार झाल्याचा सबळ पुरावा नाही.

Protected Content