एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल शहराजवळ असलेल्या पातरखेडे ते तुराटखेडे दरम्यान टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली पीकअप व्हॅन आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. मंगळवारी दुपारी झालेल्या या अपघातामध्ये जळगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचे मृतदेहा पोराळा येथील कुटीर उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, कास्टिक सोड्याची वाहतूक करणारे टँकर (क्रमांक एमएच.४८-जे.०५२२) धुळ्याकडून जळगावकडे येत होते. तर एमएच-१५-एफव्ही.२३८१ क्रमांकीची पीकअप व्हॅन धुळ्याकडे जात होती. एरंडोलपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर पातरखेडे ते तुराटखेडे दरम्यान पांडुरंग मराठे यांच्या शेताजवळ पिकअपचे पुढील टायर अचानक फुटले. यामुळे पीकअप व्हॅन समोरील टँकरवर आदळली. या अपघातात पीकअपमधील दोन जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. अल्ताफ शेख वहाब मन्यार (वय ३२, रा.हाजी अहमद नगर, जळगाव) आणि शेख इक्बाल शेख ताहेर मन्यार (वय २७, रा.हाजी अहमद नगर, जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे नातेवाईक असल्याचे समोर आले. दरम्यान, या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. दोन्ही मृतदेह पारोळा येथील कुटीर रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.