पिस्तूल रोखून डॉक्टरला लुटले

जळगाव प्रतिनिधी । रुग्ण असल्याचा बहाणा करुन आलेल्यांनी संधी साधून डॉक्टरांच्या डोक्याला पिस्तूल लावून गळ्यातील एक तोळे वजनाचा सोन्याचा गोफ काढून पलायन केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली.

शहरातील दीक्षितवाडीत डॉ. महेंद्र मधुकर पाटील यांचे अथर्व क्लीनीक आहे. शनिवारी रात्री दोन जण त्यांच्या कॅबीनमध्ये आले. यातील एक रुग्ण असून त्याच्यावर उपचार करण्याचा बहाणा त्यांनी केला होता. तोंडावर रुमाल बांधलेल्या या भामट्याने अंगाला खाज येत असल्याचे कारण डॉक्टरांना सांगीतले. त्याची तपासणी करण्याआधीच दुसर्‍याने पिस्तूल काढून डॉक्टर पाटील यांच्यावर रोखले. पिस्तूल पाहून डॉ. पाटील घाबरले होते. यानंतर या भामट्यांनी डॉ. पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ काढून पळ काढला. पळून जात असताना डॉ. पाटील यांच्यासह कंपाउंडर गोपाळ भास्कर सोनवणे यांनी भामट्यांना पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र त्यांना यश आले नाही. दरम्यान, आत आलेल्या दोघांचे दोन साथीदार क्लिनीकच्या बाहेर उभे होते. यानंतर चौघेजण दोन दुचाकींनी भरधाव वेगात पळून गेले. डॉ. पाटील यांनी आरडाओरड केली. परंतु, ते मिळाले नाहीत.

या संदर्भात डॉ. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रविवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार हे तपास करीत आहेत.

Protected Content