पिंप्री हाट येथील सैनिकाचा नगरदेवळा शिवारातील विहिरित बुडून मृत्यू

 

 

पाचोरा, प्रतिनिधी !  पिंप्री हाट ( ता. भडगाव ) येथील रहिवाशी व  नासिक येथे सैन्यात पी. टी. प्रशिक्षक पदावर सेवेत असलेल्या २६ वर्षीय जवानाचा पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा शिवारातील विहिरित मृतदेह आढळून आल्याने  खळबळ उडाली  आहे 

 

या जवानाचा मृतदेह तब्बल ३३ तासांनंतर आढळून आला असून घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जवानाचा १६ फेब्रुवारीरोजी पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील युवतीशी विवाह झाला होता. जवानाच्या मृत्यूमुळे पिंप्री हाट व तारखेडा गावांवर शोककळा पसरली आहे. अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी पोलिसांनी याच परिसरात जुगार अड्यावर छापा टाकून ३१ दुचाकींसह ८ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली होती. त्या घटनेचा जवानाच्या मृत्यूशी काही संबंध आहे की काय ? याबाबत उलटसुलट चर्चा असून याबाबतचे खरे वृत्त पोलिसांच्या चौकशीनंतरच बाहेर येणार आहे.

 

भडगाव तालुक्यातील पिंप्री हाट येथील प्रमोद पाटील २०१६ मध्ये सैन्यात भरती झाला होता. त्यानंतर नाशिक येथील पी. टी. सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून गेल्या २ वर्षांपासून सेवा देत असतांना ४ मे रोजी त्याच्या चुलत भावाचा विवाह असल्याने तो ३ मे रोजी पिंप्री हाट येथे विवाहासाठी आला होता. यानंतर एक जूनला सुटी संपणार असल्याने प्रथमच पत्नीला नाशिक येथे सोबत घेऊन  जाणार होता  तो गुरुवारी सायंकाळी कोणासही न सांगता घराबाहेर गेला

 

दरम्यान नगरदेवळा शिवारातील छबुलाल चौधरी शनिवारी सकाळी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना मृतदेह पाण्यावर तरंगत्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी घटनेबाबतची माहिती नगरदेवळा दुरक्षेत्राच्या पोलिसांना कळविली. प्रमोद पाटील घरी न असल्याने घरच्या मंडळी त्याचा शोध घेत फिरत होते. प्रमोद पाटील यांचा चुलत भाऊ समाधान पाटील घटनास्थळी पोचल्याने त्याने प्रमोदच असल्याचे ओळ्खल्यानंतर जोराने हंबरडा फोडला.  समाधान पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयताचे पश्चात आई, वडील, पत्नी, १ भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे.

 

नगरदेवळा येथील छबूलाल चौधरी यांच्या शेतातील केळीच्या बागेत पत्याचा क्लब सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांना मिळाली होती. त्या जुगार अड्यावर गुरुवारी मध्यरात्री जळगाव येथील एस. आर. पी. प्लाटुन पथक व भडगावचे पो नि अशोक उतेकर यांच्या नेतृत्वाखाली जुगार अड्यावर धाड टाकून ७ लाख ५१ हजार रुपये किमतीच्या ३१ दुचाकी, १ लाख २१ हजार ५८० रुपये रोख जप्त करून २१ जुगारींवर कारवाई करण्यात आली होती. नेमके त्याच शेत मालकाच्या शेतात प्रमोद पाटील या सैनिकाचा मृतदेह आढळून आल्याने त्या घटनेशी याचा संबंध आहे की काय ? याबाबत चर्चेला उधाण आले असून पोलिसांच्या चौकशी नंतरच जवानाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे  करीत आहेत.

 

Protected Content