अहिरे व उखळवाळी रस्त्यावर होणार 4.50 कोटींचा पूल
धरणगाव प्रतिनिधी । गावाच्या विकासकामात कोणतेही राजकारण न आणता कामे करा, यासाठी जनतेत राहून आपल्या जनहिताची कामे करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील पिंप्री खुर्द आणि खर्दे येथे विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन सोहळ्यात पालकमंत्री बोलत होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर केलेल्या पिंप्री खुर्द आणि खर्दे येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करण्यात आले. यात पिंप्री येथे ग्राम निधीतून पेव्हर ब्लॉक-१० लक्ष; चौदाव्या वित्त आयोगातून भूमिगत गटार-१० लक्ष; अनुसुचीत जाती व नवबौध्द घटकांचा वस्तीचा विकास करणे अंतर्गत पोहच रस्ते व अंतर्गत रस्ता कांक्रीटीकरण ११ लक्ष; मुलभूत सुविधांच्या अंतर्गत (२५/१५) योजनेच्या अंतर्गत पेव्हर-११ लक्ष आणि कॉंक्रीटीकरण-६ लक्ष अशा एकूण ४८ लाख रूपयांच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यातील रस्ता कॉंक्रिटीकरण आणि २५/१५ योजनेतील पेव्हर ब्लॉक ही कामे आधीच सुरू करण्यात आले असून उर्वरित कामांचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलनांता ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मतदारसंघातील कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. खरं तर विकासकामांमध्ये कुणीही राजकारण आणू नका. गावात एकोप्याने कामे करा. ग्रामीण पातळीवर लोकप्रतिनिधींनी जनतेच्या कायम संपर्कात राहून त्यांच्या अडचणी समूजन घेत त्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. अर्थात, आपला लौकीक वाढवत असतांना आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार देखील करावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले. तर श्रीराम मंदिराच्या सभा मंडपासाठी निधी देण्याचे आश्वासन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
यानंतर खर्दे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये खर्दे ते साळवा या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याची साडे पाच मीटर इतके रूंदीकरण करून त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यासाठी तब्बल अडीच कोटी इतका खर्च लागला असून या पूर्ण झालेल्या रस्त्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. तर, बाभळे ते कामतवाडी या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी १ कोटी ३५ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली असून याचे भूमिपुजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात खर्दे येथील सरपंच कैलास पाटील यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खर्दे येथे ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, गावातील व्यायामशाळा आणि नदीवरील पुलाच्या कामाचा आपण पाठपुरावा करत आहोत. उखळवाडी ते अहिरे या गावांच्या दरम्यान असणार्या पुलासाठी तब्बल साडे चार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर खर्दे ते कुरणपाट ते बाभळे या रस्त्याला दर्जोन्नत करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मतदारांचे प्रेम हे माझे शक्तीपीठ आहे. त्यांच्याकडून आम्हाला सातत्याने काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. यातून ग्रामीण भागातील रस्ते कामांना गती देण्यात आली असून याच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील दरी मिटण्यास मदत होणार आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील, सरपंच भगवान महाजन, सुनिल बडगुजर यांनी व जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, खर्दे सरपंच कैलास पाटील पिंप्री सरपंच सरलाताई बडगुजर, परिसरातील सरपंच भगवान महाजन, गणेश पाटील, रमेश पाटील, सुदर्शन पाटील, धनराज पाटील, गोरख पाटील मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील , उपसरपंच मंगल पाटील, सा.बा.चे उप अभियंता मुकेश ठाकूर, शाखा अभियंता सी. व्ही. महाजन, एस. ए. सपकाळे, माजी सभापती अनिल पाटील, दिपक सोनवणे, भगवान महाजन, डी ओ पाटील, ग्रा. पं. सदस्य सुनिल बडगुजर सर , कमलताई बच्छाव, ईश्वर बच्छाव, शिवाजी महाजन, भोद सरपंच राजू पाटील, डी.पी. मनोरे, सुनिल बोरसे यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती दिपक सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन बाळू सपकाळे यांनी केले तर आभार उपसरपंच मंगलअण्णा पाटील यांनी मानले.