पिंपळगाव हरेश्वर येथे एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रमाची सांगता

 

जळगाव, प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्र आणि जिंदगी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात घेण्यात आलेल्या एचआयव्ही एड्स या विषयावरील जनजागृती कार्यक्रमाची सांगता पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालय येथे झाली.

जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील माध्यमिक विद्यालयांमध्ये एचआयव्ही एड्स विषयावर १४ वर्षांवरील मुलामुलींमध्ये या कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली.
विविध प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांमधून मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यात आले. शिवाय जिल्हाभरात या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एचआयव्ही एड्स वर मुला-मुलींमध्ये घेण्यात आलेल्या प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांपर्यंत याविषयाची अचूक माहिती पोहोचली. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील रामभाऊ जिभाऊ विद्यालय, यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा माध्यमिक विद्यालय तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय या ३ शाळांची जिंदगी फाउंडेशनने सर्वोत्तम शाळा म्हणून निवड केली. जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या या जनजागृती कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी, ग्रामविकास विद्यालयाचे विक्रम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव आणि सचिव अजय पाटील यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली.
ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर येथे झालेल्या शेवटच्या कार्यक्रमाला मुख्याध्यापक के.एम. बडगुजर आणि उपमुख्याध्यापक पी. एस. महाजन उपस्थित होते.

Protected Content