पारोळा, प्रतिनिधी | एकीकडे सरकार ‘झाडे जगवा’ चा नारा देवून दरवर्षी कोट्यवधी वृक्ष लागवडीचे संकल्प करीत आहे. गावोगावी सामाजिक वनीकरण विभाग लाखो रुपये खर्चून झाडे लावण्याचे कार्य करत आहे. त्याचवेळी तालुक्यात वन विभागाची अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा अथवा आशीर्वादाने राजरोसपणे वृक्षांची कत्तल होतांना दिसत आहे.
या प्रकाराकडे सामाजिक वनीकरण विभाग व वरिष्ठ वन अधिकारी यांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना विचारले असता आमच्या तालुक्यात कुठेही वृक्ष तोड होत नाही, असे सांगितले जाते.
सामाजिक संस्था व वैयक्तिक स्तरावरही वृक्ष लागवड व संगोपन केले जात असताना नगाव, पळासखेडे, बाभळेनाग, धुळपिंप्री, लोणी शिवारातील शेतात असलेल्या डेरेदार निंबाची व बाभुळ अशा वृक्षांची तेथील अज्ञात इसमाकडून रोजरोसपणे दिवसा कत्तल करण्यात येत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना वाटते की, कुणी शेतकऱ्याने त्याच्या शेतातील झाडे तोडायला दिली असतील. असे समजून दुर्लक्ष करीत आहेत. मात्र सर्रास सुरु असलेल्या या वृक्ष कत्तलीबद्दल वनविभाग उदासीन दिसून येत आहे.
अशाप्रकारे गावात अनोळखी असलेले लोक येवून बिनधास्तपणे वृक्षतोड करतात. त्यामागे कुणाचा छुपा पाठिंबा तर नसावा ना ? अशी शंका ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. ज्या विभागात वृक्ष तोड दिसून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सरकारने वर्षानुवर्ष कितीही कोट्यवधी झाडे लावली तरी त्याचा उपयोग होणार नाही. असे मत गावकरी व्यक्त करीत आहेत.