पारोळा तालुक्यात ‘एक गाव एक होळी’ अभियान राबविण्याची मागणी

 

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील इको फ्रेंडली होळी अभियानांतर्गत एक गाव एक होळी अभियान राबविण्यात यावी अशी मागणी निसर्ग मित्र समितीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, प्रदेशाध्यक्ष डी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्कार प्राप्त मनवंतराव साळुंखे, पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील, संजय बागडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष, संपुर्ण तालुक्यात व्यापारासाठी भ्रमंती करणारे सुकलाल महाजन, युवा सामाजिक कार्यकर्ता सिध्दुराज महाजन व अनेक पर्यावरण प्रेमी ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवासी नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी यांना सादर करण्यात आले.

निवेदनात आवाहन केले आहे की, पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज असून होळी निमित्ताने होणारी वृक्षतोड व पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी सर्वत्र ‘एक गाव एक होळी’ अभियान राबवून पर्यावरणाच्या राष्ट्रीय उपक्रमाला प्राधान्य द्यावे. तसेच ज्याप्रमाणे ‘एक गाव एक गणपती’ हे अभियान राबविले जाते त्याच धर्तीवर ‘एक गाव एक होळी’ हा कार्यक्रम राबविण्यात यावा. कारण होळीनिमित्त प्रचंड वृक्षतोड होते. पाण्याची नासाडी होते . त्याचप्रमाणे होळी निमित्ताने मोठया प्रमाणात भांडण तंटे होतात. त्यासाठी सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, गांवातील सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना देऊन सर्व ग्रामस्थांना गाव पातळीवर आपल्या परिसरातील कार्यकर्त्यांना बोलावून ‘एक गाव-एक होळी’ साजरी करण्याचे आवाहन करून पर्यावरणाच्या राष्ट्रीय कार्याला प्रेरणा व प्रोत्साहन दयावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

तहसिल कार्यालयाच्या व पंचायत समितीच्या विविध माहिती देणाऱ्या भागावर व शहरात आणि ग्रामिण भागात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची नासाडी थांबवा, कचऱ्याची व साधी होळी साजरी करा, केमिकल्सचे रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरा, वृक्षांची जोपासना पाण्याची बचत करा, इको फ्रेंडली होळी साजरी करु या, याबाबत माहिती देणारे रंगीत व आकर्षक पोस्टर लावण्यात आले.

Protected Content