दोनगाव, ता. धरणगाव प्रतिनिधी । कर्तव्याला हद्द नसते हे मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात कर्तव्याला असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील यांच्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही सपोनि पाटील यांनी दोनगाव ग्रामस्थांच्या मदतीने उत्तम कामगिरी केली. कोरोना संकट काळात थर्मल गन, ऑक्सिजन मीटर, बी पी मीटर, व मास्क, जीवनड्रॉप, आर्सेनिक औषधांचे वाटप करून जनजागृती केली.
कोरोना संकट काळात मुंबईत कर्तव्य बजावताना सहाय्यक पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील यांचा पाय फ्रॅक्चर झाला अन् ते जळगाव येथील मूळगाव दोनगाव येथे आले आले. मुंबईहून आल्यामुळे सपोनि लीलाधर पाटील यांनी स्वत:ला १४ दिवस कॉरंटाईन करून घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना गावात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बाबींचा तुटवडा असल्याचे सपोनि पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ गावातील तरुण, ज्येष्ठ मंडळी व व्यवसायासठी गावाबाहेर असलेल्यांपुढे एक प्रस्ताव मांडला. ग्रामस्थांच्या हितासाठी योग्य असलेल्या या प्रस्तावाला सर्वांनी एकमताने होकार दिला आणि बापूसाहेब आर. डी. पाटील यांनी तर तात्काळ ५ हजार १०० रुपयांची देणगी जाहीर केली. दरम्यान, पुढची रणनीती ठरवण्यासाठी “दोनगाव कोरोना योद्धा” या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. त्याद्वारे ८० हजार रुपयांची देणगी जमा करण्यात आली. या देणगीतून गावासाठी थर्मल गन, ऑक्सिजन मीटर, बी.पी. मीटर, मास्क व जीवनड्रॉप आदींची खरेदी करण्यात आली. गावातील अनेकांची तपासणी करून कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येऊ शकतो, हे सांगण्यात आले. तसेच शासनाकडून आर्सेनिक अल्बमच्या ३०० छोट्या बॉटल राहुल कैलास पाटील यांनी आणल्या व मनपा उपायुक्त कपिल पवार यांच्याकडून २०० बॉटल अशा एकूण ५०० आर्सेनिक बॉटलचे वाटप ग्रामस्थांना करण्यात आले. तसेच दोनगाव खुर्द व बुद्रुक दोन्ही गावात घराेघरी लहानपासून ते वयोवृद्धांपर्यंत उत्तम दर्जाचे डबललेयर कॉटन मास्क व पिण्याच्या पाण्यात टाकण्यासाठी ‘जीवनड्रॉप ‘च्या बॉटल्या देण्यात आल्या. तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही गावात धूरफवारणी व निर्जंतुकीकरण पूर्ण केले. आपल्याच गावातील ग्रामस्थांचे आरोग्य जपण्यासाठी दोनगावचे सपोनि लीलाधर पाटील, राहुल कैलास पाटील, मिलिंद अहिरे, अमोल पाटील, सुरेश पाटील, करण चव्हाण, कुलदीप पाटील, सतीश पाटील, जितेंद्र पाटील, भगवान पाटील, राहुल पाटील यांनी खूप निस्वार्थपणे माणुसकी जपली. या उपक्रमाचे कौतुक पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिक करत आहे. धरणगावचे नायब तहसीलदार मिलिंद मोहोळ, बीडीओ स्नेहा कुलचे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.