पात्र होऊनही शेतकरी कर्जमाफी पासून वंचित ; आधार प्रमाणिकरणाचा खोडा

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील २२ विविध कार्यकारी सहकारी संस्थानी शासनाकडे कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी पाठवली होती. शासनाने सदर कर्ज पात्र शेतकरी यादीला मंजुरी देऊन ३० एप्रिल रोजी याद्या जाहीर केल्या. परंतु, प्रत्यक्षात लाभ मिळाला नसल्याने शेतकरी येत्या खरीप हंगामात पैशाच्या अभावी पेरणी करू शकणार नसल्याने त्यांचे संपूर्ण वाया जाणार असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित विषयावर यंत्रणेला निर्देश द्यावेत अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेंदूर्णी येथील दक्षिण भाग विविध कार्यकारी सोसायटीचे ३५८ व उत्तर भाग सोसायटीच्या ४८ सभासदांची नावे आहेत. तसेच परिसरातील इतर सोसायट्यांचे जवळ जवळ १५० सभासद नावे आहेत. लॉक डाउन जाहीर झाला त्या दिवसापासून आजतागायत हे शेतकरी लाभापासून वंचित आहेत. कारण मार्च महिन्यात कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या. परंतु, २२ सहकारी संस्था या योजनेपासून वंचित राहून गेल्या. ही बाब शेंदुर्णी येथील मा.जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांच्याकडे सोसायटी संचालक मंडळांनी मांडली असता त्यांनी दि. २२ एप्रिल रोजी राज्यांचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना याबाबत निवेदन देऊन संस्थांच्या पात्र सभासदांचा तात्काळ कर्जमाफी योजनेमध्ये समावेश व्हावा म्हणून विनंती केली. तसेच वेळोवेळी पाठपुरावाही केला याची दखल घेऊन सहकार मंत्र्यांचे आदेशाने जिल्ह्यातील २२ विकास संस्थांच्या कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्या असून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु, लॉक डाउनमध्ये ई सेवा केंद्रांना आधार प्रमाणीकरण करण्यास बंदी घालण्यात आली होती ती आजही कायम आहे म्हणून शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करता येत नाही व जोपर्यंत आधार प्रमाणीकरण होत नाही तोपर्यंत कर्ज माफी लाभही मिळत नाही. तसेच सोसायटीच्या कर्जदारांना ३१ मे पर्यंत कर्जमुक्त होणे बंधनकारक असल्याने आधार प्रमाणिकरणा अभावी शेतकरी कर्ज मुक्त न झाल्यास त्यांना नवीन कर्जही मिळणार नाही त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणासाठी ई सेवा केंद्रांना आदेश देणे गरजेचे झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीचा क्रांतिकारक निर्णय घेऊन थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली व त्यासाठी निधींची तरतूद पण केली. त्यानुसार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यादी जाहीर होऊन प्रत्यक्षात ११ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी लाभ देण्यात आला . पण कोरोना आपत्तीमुळे उर्वरित शेतकऱ्यांना लाभ द्यायचे राहून गेले होते त्यांच्या याद्या जाहीर केल्या. पण आधार प्रमाणिकरणाअभावी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी रक्कम जमा होणे बाकी आहे.

Protected Content